Site icon Housing News

म्हाडा मुंबई मंडळ सोडतीसाठी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

Last date to submit application for MHADA Mumbai board draw is 19th September till 12 noon

सप्टेंबर 16, २०२४ :– महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार आहे.

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला दि. ०९ ऑगस्ट, २०२४ रोजी दुपारी १२ वाजेपासून प्रारंभ झाला. सोडतीला अर्जदारांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोडतीसाठी आज दि. १३ सप्टेंबर, २०२४ रोजी सायंकाळी ०७.०० वाजेपर्यंत ७५,५७१ अर्ज प्राप्त झाले असून सुमारे ५५,००० अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत.

दि. ०८ ऑक्टोबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता मुंबईतील नरीमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस/एनइएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत आहे. दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी ०६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. २९ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२. ०० वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. दि. ०३ ऑक्टोबर, २०२४ रोजी सायंकाळी ०६.०० वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी ०६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. सोडत झाल्यानंतर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

मुंबई मंडळाच्या सन २०२४ च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) ३५९ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) ६२७ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) ७६८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) २७६ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळाने बांधलेल्या १३२७ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त ३७० सदनिका (नवीन व मागील सोडतीतील सदनिका) व मागील सोडतीतील विविध वसाहतीतील विखुरलेल्या ३३३ सदनिकांचा समावेश आहे.

सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास मुंबई मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणूकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन म्हाडातर्फे करण्यात येत आहे.

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)
Exit mobile version