July 9,2024: म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध वसाहतींमधील १७३ व्यावसायिक गाळ्यांच्या विक्रीसाठी राबविलेल्या ई-लिलावातील यशस्वी अर्जदारांना १० जुलै २०२४ पासून तात्पुरते देकारपत्र देण्यात येणार आहे. तसेच बोलीच्या दहा टक्के रक्कम अदा केल्यानंतर उर्वरित रकमेसाठी कर्ज घेण्याकरिता अर्जदारांना ना हरकत प्रमाणपत्र घेता येणार आहे. बोलीची संपूर्ण रक्कम भरल्यानंतर अर्जदारांना मंडळाद्वारे वाटपपत्र व अनिवासी गाळ्याचा ताबा देण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळातर्फे देण्यात आली आहे.
दरम्यान, या ई लिलावातील यशस्वी अर्जदारांच्या स्वीकृतीसाठी दहा दिवसांचा अवधी देण्यात आला. मुंबई मंडळातर्फे १७३ अनिवासी गाळयांच्या ई-लिलावाद्वारे विक्रीसाठी ०१ मार्च २०२४ रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली व निकाल २८ जून २०२४ रोजी जाहीर झाला. त्यानुषंगाने ११२ गाळ्यांकरिता ६०४ अर्जदारांनी विहित अनामत रकमेचा भरणा करीत लिलावात बोली लावली. ६१ अनिवासी गाळ्यांना अर्जदारांचा शून्य प्रतिसाद मिळाला. मंडळातर्फे १७३ अनिवासी गाळ्यांसाठी ९७.७४ कोटी रुपये बोली निश्चित करण्यात आली होती. या लिलावात ११२ गाळ्यांसाठी अर्जदारांनी १७१.३८ कोटी रुपयांपर्यंत बोली लावली. ई-लिलावामध्ये एका अनिवासी गाळ्याला १३.९४ कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावण्यात आली.