August 13,2024: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) पाचवा लोकशाही दिन ‘म्हाडा‘चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आज उत्साहात पार पडला.
म्हाडा मुख्यालयात आयोजित या लोकशाही दिनात प्राप्त नऊ अर्जांवर यशस्वी सुनावणी घेण्यात आली. सर्व अर्जदारांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली व त्यांच्या तक्रार अर्जावर योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याचे निर्देश श्जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
आजच्या लोकशाही दिनात प्राप्त व स्वीकारलेल्या नऊ निवेदन/अर्जांपैकी सात अर्ज मुंबई मंडळाशी संबंधित होते. एक अर्ज मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाशी व एक अर्ज पुणे मंडळाशी संबंधित होता.
अर्जदार सुरेखा काळे यांनी सन २००७ मध्ये म्हाडाची सदनिका विकत घेऊन सदनिकेच्या एकूण विक्री किंमतीपैकी काही रक्कम अर्जदाराकडे थकीत होती. अर्जदाराने अनेक वर्षं उर्वरित विक्री किंमतीचा थकीत भरणा न केल्याने म्हाडातर्फे विलंब शुल्क म्हणून विक्री किंमतीवर सुमारे रु. ०७,५०,००० व्याज आकारण्यात आले. सदर विलंब शुल्क माफ करणेबाबत अर्जदार काळे यांनी केलेल्या मागणीबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष श्जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्यांना कागदपत्रांची पडताळणी करून व्याज माफ करण्याबाबत पर्याय शोधून प्रस्ताव तयार करण्यात यावे, असे निर्देश संबंधित अधिकार्यांना दिले.
तसेच अर्जदार हिरेन मेहता सन २०१४ सदनिका सोडतीतील लाभार्थी आहेत प्रतीक्षा यादी कार्यान्वित झाल्याने सन २०२३ मध्ये नक्षत्र सहकारी गृहनिर्माण संस्था, दहिसर पूर्व येथील म्हाडा सदनिकेचा ताबा घेतला. मात्र, सदनिकेचा ताबा घेण्यापूर्वी सन २०१४ पासूनचे थकीत देखभाल खर्च त्यांच्याकडून आकारण्यात आले. मेहता यांनी सदर केले की सदनिका ज्या तारखेपासून प्राप्त झाली आहे तेव्हापासून देखभाल खर्च आकारने उचित राहील, अशी भूमिका मांडली. सदर देखभाल खर्चाबाबत संबंधित अधिकार्यांनी अभ्यास करून अशा प्रकारच्या अनेक तक्रारींसंदर्भात सारासार विचार करून नियमांच्या अधीन राहून सकारात्मक प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश श्री. जयस्वाल यांनी आज लोकशाही दिनात दिले. धोरणात्मक निर्णयांच्या अभावी वर्षानुवर्षे नागरिक केवळ कार्यालयाच्या फेर्या मारत असल्याची बाब खेदजनक असल्याचे मत व्यक्त करत श्री. जयस्वाल यांनी म्हाडा हे लोकाभिमुख कार्यालय असल्याने नागरिकांच्या हिताचे व सोयीचे धोरण स्वीकारणेबाबत संबंधितांना निर्देश याप्रसंगी दिले.
लोकशाही दिनात आज प्राप्त निवेदन अर्जांवर केलेल्या कार्यवाहीचा अहवाल येत्या १५ दिवसांत देण्याचे निर्देशही जयस्वाल यांनी दिले. तसेच मागील लोकशाही दिनातील प्रलंबित अर्जाचा निपटारा करण्याच्या सूचनाही श्री. जयस्वाल यांनी केल्या.