म म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर व उपनगरांतील संक्रमण शिबिरांमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणास आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे. सहकार नगर चेंबूर येथील वसाहतीतील संक्रमण शिबिरातील सुमारे १९५ भाडेकरु/रहिवासी यांचे आज बायोमेट्रिक सर्वेक्षण यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले.
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीत मुंबई शहर व उपनगरात एकूण ३४ ठिकाणी संक्रमण शिबिरे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या १३ सप्टेंबर २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांचे अ, ब व क प्रमाणे वर्गीकरण होणे आवश्यक करण्यात आले. त्यानुषंगाने मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील संक्रमण गाळ्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांच्या वास्तव्याची प्रमाणता निश्चिती करण्याची जबाबदारी राज्य शासनाने नुकतीच एका अधिसूचनेद्वारे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाकडे सोपविली. मंडळाच्या संक्रमण शिबिरांतील गाळ्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या भाडेकरूंची आधार कार्ड मध्ये नोंद असलेली माहिती तसेच ई-केवायसी अधिप्रमाणन सुविधेचा वापर करून बायोमेट्रिक सर्वेक्षणाच्या आधारे मंडळातर्फे पडताळणी करण्यात येणार आहे. या आधारे संक्रमण शिबिरातील भाडेकरूंच्या वास्तव्याची प्रमाणता अधिकृत किंवा अनधिकृत असल्याची निश्चिती मंडळातर्फे करण्यात येत आहे. या सर्वेक्षणाला रहिवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी सुद्धा सहकार नगर, चेंबुर वसहतीतील संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांच्या मागणीनुसार बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. १२ ते १७ फेब्रुवारी या कालावधीत गोरेगाव पूर्व येथील बिंबिसार नगरमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार आहे. बिंबिसारनगर नंतर उर्वरित वसाहतीमधील इमारतीमध्ये राहणा-या भाडेकरु/रहिवासी यांचा बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्यात येणार असून संक्रमण शिबिरातील सर्व गाळेधारक भा/र च्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाचे काम म्हाडाने योजिले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या दि. १३ सप्टेंबर, २०१९ रोजीच्या शासन निर्णया नुसार मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील संक्रमण शिबिरातील अनधिकृत रहिवाशांचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने सर्वंकष विचार करून त्यांचे ‘अ ‘ ‘ब’ ‘क’ प्रमाणे प्रवर्ग करण्यात आले आहेत. ‘अ’ प्रवर्गात मूळ रहिवासीयांना संक्रमण शिबिरामध्ये स्थानांतरण करण्यात आले आहे. ‘ब’ प्रवर्गात अशाप्रकारचे रहिवाशी ज्यांनी मुखत्यार पत्र किंवा तत्सम प्राधिकारपत्राद्वारे मूळ रहिवाशांकडून संक्रमण शिबिरातील गाळ्यांचा हक्क घेतला आहे, तसेच ‘क’ अशाप्रकारचे घुसखोर रहिवाशी ज्यांनी म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील गाळ्यांचा अनधिकृतपणे ताबा घेतला आहे. यानुसार मंडळातर्फे सर्वेक्षणाची कार्यवाही सुरू आहे .
जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा. |