मुंबई, दि. १२ जून, २०२५ : दक्षिण मुंबईतील प्राचीन व ऐतिहासिक महत्व लाभलेल्या कामाठीपुरा क्षेत्राच्या समूह पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा आज जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्प राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार असून दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक १ ते १५ या भागातील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा व भूखंडांचा एकत्रितरित्या समूह पुनर्विकास हा विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४, विनियम ३३ (९) अंतर्गत म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत केला जाणार आहे. हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री. राहुल नार्वेकर, स्थानिक खासदार श्री. अरविंद सावंत, आमदार श्री. अमीन पटेल तसेच स्थानिक नागरिकांचा मोठा सहभाग लाभला आहे.
दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्वाच्या ३४ एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक १ ते १५ या गल्ल्यांमध्ये सुमारे ९४३ उपकरप्राप्त इमारती असून यामध्ये सुमारे ६६२५ निवासी व १३७६ अनिवासी असे एकूण ८००१ भाडेकरू / रहिवासी वास्तव्यास असून ८०० जमीन मालक आहेत. या क्षेत्रातील इमारती १०० वर्षे जुन्या आहेत. तसेच संपूर्ण भागातील भूखंडाचे निव्वळ क्षेत्रफळ सुमारे ७३,१४४.८४ चौरस मीटर आहे. या क्षेत्रातील इमारतींचे भूखंड हे अत्यंत छोट्या आकाराचे व अरुंद असल्यामुळे समूह पुनर्विकास हा शास्वत पर्याय ठरतो. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ८००१ भाडेकरू/रहिवाशांना यांना हक्काचे कायम स्वरूपी घर प्राप्त होणार आहे.
कामाठीपुरा क्षेत्रातील इमारतींचा एकत्रितरित्या समूह पुनर्विकास म्हाडातर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली २०३४, विनियम ३३ (९) अंतर्गत करण्यास १२/०१/२०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता मिळाली. त्यानुसार प्रकल्पाच्या आराखड्यासाठी निविदा मागवून मेसर्स माहिमतुरा कन्स्लटेन्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा आराखडा ‘कामाठीपुरा पुनर्वसन प्रकल्प – अर्बन व्हिलेज’ या नावाने तयार करण्यात आला आहे. या माध्यमातून रहिवाशांना मोठ्या व सुरक्षित सदनिका, नियोजनबद्ध पायाभूत सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे. यामध्ये वाणिज्यिक इमारत, मनोरंजनाचे मैदान सारख्या सुविधांचा देखील समावेश असणार आहे. तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून म्हाडास ४४००० चौ. मी. क्षेत्र निविदाधारकांमार्फत उपलब्ध होणार असल्याने मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हाडास मोठ्या प्रमाणात गृहासाठा उपलब्ध होणार आहे. तसेच विकासकास ५६७००० चौ. मी. क्षेत्र उपलब्ध होणार असून अंदाजे ४५०० सदनिका उपलब्धा होणार आहेत.
कामाठीपुरा क्षेत्रातील जमिन मालकांना शासन निर्णय दि.०२.०७.२०२४ अन्वये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ५० चौ.मी क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची ०१ सदनिका, ५१ चौ.मी. ते १०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भुखंडाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची ०२ सदनिका, १०१ चौ.मी. ते १५० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भुखंडाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची ०३ सदनिका, १५१ चौ.मी. ते २०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भुखंडाकरिता ५०० चौ. फूट क्षेत्रफळाची ०४ सदनिका, २०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाच्या पुढील प्रत्येक ५० चौ.मी. भुखंड क्षेत्रफळाकरिता ५०० चौ. फुट क्षेत्रफळाची १ अतिरिक्त सदनिका जमीन मालकांना दिली जाणार आहे.
| जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा. | 
 





