मुंबई, दि. २४ जुलै, २०२५- महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) अखत्यारीतील सर्व प्रादेशिक मंडळांची कार्यालयीन दस्तऐवज बघण्याची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत माहितीच्या स्वयंप्रकटीकरणाद्वारे (Proactive Disclousure under RTI Act) म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर म्हाडातील संबंधित सर्व विभागांचा वर्गवारीनुसार १५ कोटी दस्तऐवज (संवेदनशील वगळून) नागरिकांना केवळ पाहण्यासाठी ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे, अशी माहिती ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांनी दिली.
नागरिक केंद्रस्थानी ठेवून ‘म्हाडा’ या निमशासकीय संस्थेने सुलभ व सुरक्षितरित्या माहिती उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने याद्वारे ऐतिहासिक व धाडसी पाऊल टाकले आहे. या माध्यमातून म्हाडा कार्यालयीन प्रक्रियेतील पारदर्शकता वाढणार असून नागरिकांचा कार्यालयात येण्या-जाण्याचा त्रास कमी होणार आहे. सोडतीदरम्यान नागरिकांद्वारे घेतली जाणारी कागदपत्रे, माहिती आदीबाबत गुप्तता बाळगण्यात आली असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली असल्याचे श्री. जयस्वाल यांनी सांगितले.
म्हाडा एक लोकाभिमुख कार्यालय असल्याने नागरिकांप्रती म्हाडाचे उत्तरदायित्व अधिक आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नागरिकांचे जीवनमान सुकर होण्याच्या दृष्टीने या निर्णयाची अंमलबाजवणी करण्यात आली आहे . या पार्श्वभूमीवर म्हाडा’ चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी म्हाडा संबंधित १५ कोटी कागदपत्रे संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येतील, असे जाहीर केले होते. या आश्वासनाची पूर्तता करीत संबंधित अधिकार्यांनी तत्परतेने कार्यवाही करीत १५ कोटी कागदपत्रे ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहेत. याअंतर्गत म्हाडाच्या विविध विभागांतील सूचना, निविदा, कार्यालयीन आदेश, कार्यालयीन टिप्पणी, प्रस्ताव मंजुरी यासारख्या दस्तऐवजाचा समावेश असून नागरिकांना सदर दस्तऐवज म्हाडा संकेतस्थळावर सहज एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे माहितीच्या अधिकारांतर्गत अर्ज करण्याची आवश्यकता देखील कमी होणार आहे. संकेतस्थळावरील माहिती ई प्रमाण वापरुन प्रमाणित करण्यात आली असून सत्यापित व सुरक्षित आहे. भविष्यातील संदर्भासाठी वापरकर्त्यांचे लॉंग्सबाबतची माहिती या प्रणालीमध्ये जतन होणार आहे.
सदर सेवा वापरण्यासाठी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर नागरिकांसाठी (Citizen Corner) या विभागातील विभागनिहाय अभिलेख ( Department Wise Records) मध्ये जाऊन अर्जदाराने स्वत:ची नाव नोंदणी व लॉगिन करण्यासाठी आवश्यक माहिती ज्यामध्ये भ्रमणध्वनी क्रमांक, नाव, लिंग, जन्म दिनांक, यूजर नेम, पासवर्ड, अटी व शर्ती मंजूर करून लॉगिन, पासवर्ड नोंदवायचा आहे. अर्जदाराने आधार किंवा पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर केवायसी ओटीपी पडताळणी पूर्ण होणार आहे . यानंतरच संकेतस्थळावरील म्हाडाच्या विविध विभांगांशी संबंधित दस्तऐवज नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध होणार आहे. मात्र सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणताही दस्तऐवज डाऊनलोड करता येणार नाही अथवा त्यांचे स्क्रीनशॉट घेता येणार नाहीत.
दस्तऐवज पाहताना नागरिकांना कारण नमूद करणे बंधनकारक असणार आहे. तसेच नागरिकांच्या संकेतस्थळावरील माहितीच्या सुरक्षिततेसाठी SSL सायबर सिक्युर लेअर आणि सेक्युरिटी ऑडिटचा अवलंब करण्यात आला आहे. जेणेकरून कोणीही कोणत्याही व्यक्तीची खासगी माहिती मिळवू शकणार नाही. म्हाडाचे संकेतस्थळ माहिती शोधण्यास अधिक सोपे, सुटसुटीत व अद्ययावत करण्यात आले असून लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत सेवा अधिसूचित करून ऑनलाईन प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय प्रक्रिया सुलभ करणे आणि म्हाडाच्या कामकाजात पारदर्शकता राखणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
हमारे लेख से संबंधित कोई सवाल या प्रतिक्रिया है? हम आपकी बात सुनना चाहेंगे। हमारे प्रधान संपादक झूमर घोष को jhumur.ghosh1@housing.com |