महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज आयोजित नवव्या लोकशाही दिनात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से) यांनी आज पाच अर्जदारांच्या तक्रारीवर सुनावणी देत संबंधित अधिकार्यांना तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आणि पाचही प्रकरणांचा आजच्या आज ‘निकाल’ लावला.
श्री. जयस्वाल यांच्या वेगवान निर्णयक्षमतेमुळे अर्जदारांना कोणत्याही विलंबाशिवाय न्याय मिळाला. लोकशाही दिनात हजर असलेल्या अर्जदारांनी आपल्या समस्या तात्काळ सोडवण्यात आल्याबद्दल समाधान व्यक्त करत म्हाडा प्रशासनाचे आणि श्री. जयस्वाल यांचे आभार मानले.
म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित लोकशाही दिनात उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल यांनी अर्जदार श्री. अमृत कोरे यांच्या सन २००४ मध्ये खरेदी केलेल्या कांदिवली पश्चिम येथील म्हाडा सदनिकेच्या नियमितीकरणाबाबतच्या अर्जावर सुनावणी घेतली. संबंधित अर्जदार यांना दुपारी ०३.०० वाजेपर्यंत सदनिका हस्तांतरणाचे निर्देश संबंधित मिळकत व्यवस्थापक यांना दिले. संबंधित मिळकत व्यवस्थापक यांनी तात्काळ निर्देशांचे पालन करीत संबंधित अर्जदार यांना सदनिका नियमित करण्याबाबतचे पत्र आजच सुपूर्द केले. अशाप्रकारे अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेल्या अर्जावर श्री जयस्वाल यांनी तात्काळ निर्णय मिळवून दिला.
मुंबई दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई सेंट्रल येथील पुनर्रचित सदनिका श्री. फित्जोराल्ड ओजारीओ यांच्या नावे हस्तांतरित करण्याबाबत अर्ज केला होता. सदर सदनिका ही फित्जोराल्ड ओजारीओ यांच्या आईच्या नावे होती. आईच्या निधनानंतर त्यांच्या दोन मुलांपैकी एका मुलाच्या नावे सदनिका हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच त्या मुलाचे निधन झाले. अशाप्रकारे हयात असलेल्या मुलाच्या नावे म्हणजे श्री. फित्जोराल्ड ओजारीओ यांच्या नावे सदनिका हस्तांतरण करण्याची मागणी आजच्या लोकशाही दिनात करण्यात आली. मात्र, वारसा हक्क प्रमाणपत्र नसल्याने त्यांच्या नावे सदनिका हस्तांतरण होत नव्हते. उपाध्यक्ष श्री. संजीव जयस्वाल यांनी अर्जदाराने दिलेले क्षतिपूर्ति बंधपत्र (Indemnity Bond) ग्राह्य धरण्याच्या सूचना करून संबंधित अधिकार्यां ना तात्काळ सदनिका श्री. फित्जोराल्ड ओजारीओ यांच्या नावे करण्याचे निर्देश दिले. संबंधित अर्जदार यांच्या नावे सदनिका हस्तांतरित झाल्याचे पत्रही आजच अर्जदार यांना देण्यात आले.
तसेच कोकण मंडळाच्या सोडतीत २० टक्के सर्वसमावेशक योजनेत विजेते ठरलेल्या श्री. मोहम्मद खान यांना पार्किंग व क्लब हाऊसची सुविधा नको असताना विकासकाने प्रोसेसिंग फीसह वाढीव शुल्क आकारले आहे. संबंधित विकासकाला श्री. जयस्वाल यांनी तात्काळ दूरध्वनी करून सदर आकारलेले वाढीव शुल्क कमी करण्याचे निर्देश दिले. यामुळे अर्जदार यांना दिलासा मिळाला आहे.
चारकोप कांदिवली (पश्चिम) येथील भाग्योदय सहकारी गृहनिर्माण संस्थेत भावाच्या नावे असलेली सदनिका सन २०१६ मध्ये भावाने बक्षीस पत्र करून श्री. अनिल प्रभूलकर यांच्या नावे करून दिली. मात्र नोंदणीकृत बक्षीसपत्र नसल्यामुळे सदनिका श्री. प्रभूलकर यांच्या नावे नियमित होत नसल्याचे प्रकरण प्रलंबित होते. याप्रकरणी लोकशाही दिनात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी सदर सदनिका आजच्या आज श्री. अनिल प्रभूलकर नियमतीकरण करण्याचे निर्देश दिल्यानंतर आजच संबंधित अधिकार्यांनी सदनिका नियमित केल्याचे पत्र अर्जदारांना सादर केले.
न्यू डी एन नगर शिवनेरी सहकारी गृहनिर्माण संस्थेने तात्काळ पुनर्रचित इमारतीतील सदनिकेचा ताबा मूळ रहिवासी श्री. दिलीप सूर्यवंशी यांना देण्यासाठी संबंधित उपनिबंधक यांनी तात्काळ आदेश पारित करून प्राधिकृत अधिकारी यांची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार उपनिबंधक यांनी आजच श्री. संजय वाळंज यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नेमणूक करून त्यांना या प्रकरणी ०७ दिवसांच्या आत कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
लोकशाही दिनात आपल्या प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा झाल्याने श्री. कोरे, श्री. ओजारीओ, श्री. खान, श्री. प्रभूलकर, श्री. सूर्यवंशी यांनी श्री. जयस्वाल यांचे व म्हाडा प्रशासनाचे विशेष आभार मानले.
मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील नवी चिखलवाडी, म्हाडा कॉलनी, इमारत क्रमांक १० या पुनर्रचित इमारतीची देखभाल म्हाडाने करण्याचा अर्ज श्री. दीपक राणे यांनी लोकशाही दिनात केला. या प्रकरणी संबंधित इमारतीच्या सहकारी गृहनिर्माण संस्थेने (नियोजित) केलेल्या अर्जानुसार इमारत अभिहस्तांतरण करण्याचे निर्देश श्री. जयस्वाल यांनी दिले.
श्री. अरुण भोयर यांनी कन्नमवार नगर विक्रोळी येथील अरुण निवारा सहकारी गृहनिर्माण संस्थेकडून देखभाल खर्च देऊन देखील चुकीने व्याजासह दंड आकारणी करीत लेखापरीक्षणात त्याची नोंद घेण्याबाबत अर्ज केला. या प्रकरणी श्री. जयस्वाल यांनी संबंधित उपनिबंधक यांना कुठलीही सुनावणी न घेता केवळ श्री. भोयर यांच्या प्रकरणाबाबत संबंधित गृहनिर्माण संस्थेचे लेखापरीक्षण करून घ्यावे, असे निर्देश दिले.
आज झालेल्या लोकशाही दिनात एकूण ०७ अर्ज प्राप्त झाले. म्हाडातर्फे आतापर्यंत झालेल्या ०८ लोकशाही दिनात ८१ प्राप्त अर्जांपैकी ७५ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा. |