पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) विक्रीअभावी शिल्लक सदनिका प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर वितरित करण्यासाठी नोंदणी व वितरण प्रक्रिया https://bookmyhome.mhada.gov.in/या संकेतस्थळावर सुरु झाली आहे. सदर प्रक्रियेद्वारे सदनिका वितरीत करण्यासाठी देण्यात येणार्या ऑनलाईन देकार पत्रावर उपमुख्य अधिकारी, पुणे मंडळ यांची डिजीटल स्वाक्षरी असल्याची खात्री करुनच पुढील कार्यवाही करण्याचे आवाहन पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. राहुल साकोरे यांनी अर्जदारांना केले आहे.
श्री. साकोरे म्हणाले की, विकासकांनाही सुचित करण्यात येते की, उपमुख्य अधिकारी, पुणे मंडळ यांच्या डिजीटल स्वाक्षरीची शहानिशा केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तिसोबत सदनिकेचा विक्री करारनामा करु नये अन्यथा विकासक तसेच संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. गरजू व पात्र लाभार्थ्यांना सदर सदनिका वितरणाची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शी असून या प्रक्रियेद्वारे वितरीत करण्यात येणारे देकार पत्र ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांच्या लॉग-इन आयडीमध्ये उपलब्ध करुन देण्यात येते व त्यावर उपमुख्य अधिकारी, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांची डिजीटल स्वाक्षरी करण्यात येते. कोणतेही देकार पत्र मानवी हस्ताक्षर करुन तसेच रबरी शिक्क्याचा वापर करुन दिले जात नसल्याचे श्री. साकोरे यांनी सांगितले.
म्हाडा पुणे मंडळाने १५ टक्के सामाजिक गृहनिर्माण व २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ऑक्टोबर-२०२३ पूर्वीच्या सोडतीनंतर विक्री न झालेल्या सदनिका वितरणासाठी कोणत्याही एजन्सीची नेमणूक केलेली नाही व कोणत्याही व्यक्तीस एजंट म्हणून नियुक्त केलेले नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन श्री. साकोरे यांनी केले आहे.
जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा. |
Comments 0