म्हाडा पुणे मंडळातर्फे ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी २९ जानेवारी रोजी संगणकीय सोडत

म्हाडा पुणे मंडळातर्फे ३६६२ सदनिकांच्या विक्रीसाठी २९ जानेवारी रोजी संगणकीय सोडत

मुंबई, दि. २८ जानेवारी, २०२५ :-  पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक) पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीएसह सोलापूर जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ३,६६२ सदनिकांच्या विक्रीकरिता संगणकीय सोडत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते बुधवार, २९ जानेवारी २०२५ रोजी  दुपारी ०१.०० वाजता पुणे जिल्हा परिषद सभागृहात काढण्यात येणार आहे.  ३,६६२ सदनिकांसाठी विहित अनामत रकमेसह  ७१,६४२ अर्ज प्राप्त झाले आहेत, अशी माहिती म्हाडा पुणे मंडळाचे मुख्य अधिकारी श्री. राहुल साकोरे यांनी दिली.

 

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री तथा पुणे पालकमंत्री श्री. अजित पवार, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, म्हाडा पुणे मंडळाचे सभापती श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, अपर मुख्य सचिव श्रीमती वल्सा नायर-सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त श्री. राजेंद्र भोसले, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आयुक्त श्री. योगेश म्हसे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्री. शेखर सिंह, जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील आदी उपस्थित राहणार आहेत.

 

पुणे मंडळातर्फे दिनांक १० ऑक्टोबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली.

 

पुणे मंडळातर्फे जाहीर सोडतीत म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९३ सदनिका, २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण ३५६९ सदनिकांचा समावेश आहे.

 

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात येणार आहे. अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण (Live) बघण्याची सुविधा म्हाडाच्या @mhadaofficial या अधिकृत युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवरून करण्यात येणार आहे. वेबकास्टिंगची लिंक म्हाडाच्या  https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर व समाजमाध्यम व्यासपीठांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.

 

मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाइन अशा IHLMS २.० या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सदर सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ ठरल्यामुळे नागरिकांनी सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.


काही नागरिकांना अनधिकृत पद्धतीने घर मिळवून देतो असे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून पैसे उकळण्याची तक्रार भोसरी पोलीस स्टेशन, पिंपरी चिंचवड यांच्याकडे प्राप्त झाली आहे. त्याअनुषंगाने सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की, पुणे मंडळातर्फे ऑनलाईन पद्धतीने घरांची विक्री करण्यात येते. याबाबत वेळोवेळी जाहिरातीद्वारे अर्ज विक्री करून सोडतीद्वारे घरांचे वाटप करण्यात येते. सोडतीद्वारे वितरण करण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी पुणे मंडळाकडून कोणत्याही व्यक्तीला प्रतिनिधी अथवा मध्यस्थ म्हणून नेमणूक करण्यात आलेली नाही. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या कामासाठी कोणाशी संपर्क साधण्यात येऊ नये तसेच माहिती हवी असल्यास www.mhada.gov.in housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर किंवा मिळकत व्यवस्थापक, पुणे मंडळ यांच्याशी कार्यालयात येऊन संपर्क करावा. तसेच अर्जदारास कोणी दलाल/व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इत्यादी बाबी करताना आढळल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी जेणेकरून फसवणूक किंवा तोतयागिरी  करणाऱ्यांना आळा बसेल. म्हाडा पुणे मंडळातर्फे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर दिवे, सासवड, पिंपरी वाघेरे, महाळुंगे इंगळे ताथवडे फक्त याच ठिकाणी सदनिकांचे वितरण करण्यासाठी विपणन संस्थांची नेमणूक करण्यात आलेली असून त्यांच्याद्वारे घरांचे वितरण करण्यात येत आहे. तरीसुद्धा त्यांच्याशी व्यवहार करताना मिळकत व्यवस्थापक, पुणे मंडळ यांच्याकडून पडताळणी करून घ्यावी, असे आवाहन मुख्य अधिकारी श्री. राहुल साकोरे यांनी केले आहे.

 

जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा.

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ: उद्घाटन तारीख, स्थिती, खर्चनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ: उद्घाटन तारीख, स्थिती, खर्च
  • संक्रमण शिबिरातील रहिवाश्यांना बायोमेट्रिक सर्वेक्षणाकरिता शेवटची संधीसंक्रमण शिबिरातील रहिवाश्यांना बायोमेट्रिक सर्वेक्षणाकरिता शेवटची संधी
  • कोकण मंडळाच्या शिरढोण, खोणी येथील गृहप्रकल्पातील ०६ हजार २४८ सदनिकांच्या विक्री किंमतीत कपातकोकण मंडळाच्या शिरढोण, खोणी येथील गृहप्रकल्पातील ०६ हजार २४८ सदनिकांच्या विक्री किंमतीत कपात
  • महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटी परतावा कसा मिळवायचा?महाराष्ट्रात स्टॅम्प ड्युटी परतावा कसा मिळवायचा?
  • ‘म्हाडा’ कोकण मंडळातर्फे तिसर्‍या जनता दरबार दिनात १० तक्रारींचे निवारण'म्हाडा' कोकण मंडळातर्फे तिसर्‍या जनता दरबार दिनात १० तक्रारींचे निवारण
  • बेकायदेशीर नूतनीकरणापासून सावध रहा; घर दुरुस्तीसाठी बीएमसी मार्गदर्शक तत्त्वेबेकायदेशीर नूतनीकरणापासून सावध रहा; घर दुरुस्तीसाठी बीएमसी मार्गदर्शक तत्त्वे