७/१२ किवा सातबारा उतारा या बद्दल माहिती

महाराष्ट्रामध्ये जमीन खरेदी करण्याच्या व्यवहारामध्ये सातबारा उताऱ्याची भूमिका, तिचे महत्व आणि कायदेशीर बाबीं बाबत आपण जाणून घेऊया.

एखादा फ्लॅट अथवा अपार्टमेंट विकत घेतांना त्याबद्दलचे नियम साधारणपणे लोकांना माहीत असतात. परंतु समजा तुम्हाला एखादा जमीनीचा तुकडा (प्लॉट) महाराष्ट्रात विकत घ्यायचा असेल तर अशा बाबतीत सातबारा उतारा हा अतिशय महत्वाचा दस्ताऐवज आहे.

 

सातबारा उतारा नक्की काय आहे?

महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात जमीनी संबंधित एक नोंदणीपुस्तिका (लँड रजिस्टर) आहे ज्यात त्या त्या जिल्ह्यातील जमीनीबद्दल विस्तृत माहिती नोंदविलेली आहे. ७/१२ उतारा हा याच नोंदणीपुस्तिकेतील एक महत्वाचा भाग आहे, ज्यामुळे आपल्याला एखाद्या जमीनीविषयी विस्तृत माहिती मिळू शकते. ७/१२ उतारा हा महसूल विभागातर्फे तहसीलदारा मार्फत दिला जातो, ज्यामध्ये जमीनीचा मालकी हक्क, वहिवाटीचे हक्क (OCCUPANCY), दायित्व (LIABILITIES), त्याचा सर्वे नंबर, मालकीहक्काची तारीख इत्यादी माहिती मिळते.  ७/१२ उतारा हा गाव-तालुका-जिल्हा याबद्दलची माहिती देतो. यातील ७ नंबर म्हणजे गाव नमुना ७ (फॉर्म ७), यामध्ये मालक व त्याच्या अधिकाराबद्दलची माहिती असते,  तर १२ नंबर म्हणजे गाव नमुना १२ (फॉर्म १२) मध्ये जमीनीच्या कृषीगुणविशेषाबद्दल माहिती असते.

गाव नमुना ७ मध्ये अधिकाराची नोंद, वहिवाटदाराची माहिती, मालकीचा तपशील, भाडेकरूंबद्दलची माहिती, धारकाची महसुलाची बंधने आणि जमीनीसंबंधी इतर माहिती असते. गाव नमुना १२ मध्ये पिकांचे तपशील, त्यांचे प्रकार आणि पिकांसाठी वापरलेली जमीन याबद्दल माहिती असते.

७/१२ उतारा हा मालकी हक्काचा पुरावा म्हणून निर्नायकी दस्ताऐवज नाही परंतु तो महसुलाचे दायित्व निश्चित करण्याची नोंद करतो. मालमत्तेच्या नावाचे हस्तांतरण फक्त ७/१२ उतारा करू शकत नाही.

 

७/१२ उताऱ्याचे महत्व

७/१२ उतारा जमीनीच्या मालकीहक्काचा इतिहास दर्शवतो त्यामुळे जमीनीसंबंधात भूतकाळातील विवाद तसेच कायदेशीर आदेश तपासणे सुलभ होते.

यामध्ये जमीनीचा वापर कशासाठी झालाय याची माहिती असल्याने ती शेतजमीन आहे का तसेच कुठल्या प्रकारची पिके तिथे घेतली जातात याविषयी जाणण्यास मदत होते.

 

७/१२ उतारा कसा मिळवाल?

७/१२ उतारा मिळवण्यासाठी स्थानिक तहसीलदारांकडे जमीनीची उपलब्ध माहिती व  ७/१२ मागण्याचे कारण नोंदवून अर्ज करता येतो. तसेच महाराष्ट्र सरकारच्या वेबसाईटवरून सुद्धा ७/१२ उताऱ्याची माहिती मिळू शकते. योग्य व आवश्यक तपशील नोंदविला तर अतिशय सुलभ रीतीने हि माहिती उपलब्ध होते. ऑनलाईन माहिती जर मिळत नसेल तर तुम्हाला वैयक्तिकरित्या अर्ज करावा लागतो.

 

जर तुम्ही एखादी जमीन खरेदी करत असाल तर ७/१२ उतारा हा अतिशय महत्वाचा दस्तऐवज आहे, जमीनीचा इतिहास व त्यासंबंधीच्या सर्व शंका यामुळे मिटू शकतात, तसेच जमीन खरेदीविषयी पुढचे पाऊल टाकायला मदत होईल. तरीही संभाव्य खरेदीदाराणे लक्षात ठेवणे गरजेचे आहे कि ७/१२ उतारा हा मालकी हक्काचे नाव बदलण्यासाठीचे दस्ताऐवज म्हणून वापरला जात नाही, तो फक्त जमिनीची ताबा माहिती व कर यासंबंधी नोंदणी दस्ताऐवज म्हणून वापरला जातो.

 

७/१२ उताऱ्याचे ५ उपयोग

१) तुम्ही जी जमीन घेणार आहे त्यापर्यंत पोहचण्यासाठी तसेच नियमित वापरासाठी तेथे रस्ता आहे कि नाही याची माहिती मिळते.

२)  तुम्ही जर जमीन विकत घेतली तर जमीनीचे अधिकार तुमच्या नावावर हस्तान्तरित होतात व त्याची नोंद एक कायदेशीर दस्ताऐवज म्हणून  ७/१२ उताऱ्यात दिसते.

३) मालमत्तेच्या संबंधात जर बँकेतून कर्ज काढत असाल तर बँकेसाठी ७/१२ उतारा हा महत्वाचा दस्तऐवज असतो व ती त्याची मागणी करते.

४) नागरी कायदेशीर विवादात वापरला जाऊ शकतो.

५) जमीन वाटप, कायदेशीर विवाद, जमिनीच्या कर्जाचा तपशील या संबंधित माहिती मिळते

Comments

comments