महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) बारावा लोकशाही दिन सोमवार दिनांक ९ जून, २०२५ रोजी, दुपारी १२ वाजेपासून ‘म्हाडा’च्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात चौथ्या मजल्यावरील सभागृहात उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात येणार आहे.
म्हाडा प्रशासनातर्फे नागरिकांना कळविण्यात येत आहे की, जानेवारी-२०२४ पासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयातील सभागृहात म्हाडा लोकशाही दिन आयोजित करण्यात येत आहे. आतापर्यंत म्हाडामध्ये अकरा लोकशाही दिनाचे यशस्वी आयोजन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले आहे. सदर लोकशाही दिनांमध्ये प्राप्त १०३ अर्जापैकी ९६ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत.
लोकशाही दिनांतर्गत नागरिकांच्या तक्रारींवर संबंधित अधिकार्यांच्या उपस्थितीत थेट व खुली चर्चा केली जाते. यामुळे वर्षानुवर्ष प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली निघाली असून नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि त्वरित न्याय मिळत आहे. या उपक्रमामुळे म्हाडा प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी व नागरिकांप्रती संवेदनशील बनले असल्याचा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. तसेच लोकशाही दिन हा नागरिक आणि प्रशासन यांच्यातील विश्वासाचा मजबूत दुवा ठरत आहे.
म्हाडा प्रशासनाद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, आपल्या तक्रारी अथवा प्रश्न लोकशाही दिनामध्ये उपस्थित करावेत. तसेच न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व/अपील्स, सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे /देण्यात येणार आहे अशा प्रकरणाची पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे नसेल असे अर्ज म्हाडा लोकशाही दिनात स्वीकारले जाणार नाहीत. जे अर्ज लोकशाही दिनाकरिता स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आवश्यक कारवाईसाठी आठ दिवसात पाठवण्यात यावे व त्याची प्रत अर्जदारास पृष्ठांकित करणे गरजेचे आहे.
जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा. |