मुंबई, दि. ०५ फेब्रुवारी, २०२५ : केंद्र शासनाच्या नीती आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार मुंबई महानगर प्रदेशात गृहनिर्माण ग्रोथ हब प्रकल्प राबविण्यात येणार असून या ग्रोथ हब प्रकल्पांतर्गत सन २०३० पर्यंत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) माध्यमातून सुमारे आठ लाख घरे उभारली जाणार आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री. श्री एकनाथ शिंदे यांनी आज केले
म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २१४७ सदनिका व ११७ भूखंड विक्रीकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात आज संगणकीय सोडत उत्साहात काढण्यात आली. यावेळी श्री. शिंदे बोलत होते
उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे म्हणाले की, सर्वसामान्यांची गृहस्वप्नपूर्ती म्हाडा करीत आहे. दर्जेदार परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. शासनाने समाजातील सर्व घटकांसाठी योजना आणल्या आहेत. ‘म्हाडा’च्या २३४७ सदनिका व ११७ भूखंडांसाठी सुमारे २४,७११ अर्जदारांचा उत्स्फूर्त प्रतिसादावरून म्हाडाची विश्वासार्हता वाढली आहे हे दिसून येते. ‘म्हाडा’ने सोडतीतील विजेत्या अर्जदारांना सदनिकांचा ताबा तात्काळ द्यावा व गुणवत्तेच्या बाबतीत कुठलीही तडजोड करू नये. सर्वसामान्य नागरिकांना उत्तम दर्जेदार घरी मिळाली पाहिजे, यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून त्याकरिता काही नियम बदलण्याचे सुतोवाच श्री. शिंदे यांनी केले. महाराष्ट्र शासन लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करणार असून या धोरणांतर्गत अधिकाधिक परवडणारी घरे, भाडेतत्त्वावरील घरे उभारण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिक, काम करणाऱ्या महिला, विद्यार्थी यांच्यासाठी वसतिगृह बांधण्याचे प्रयोजन आहे. गिरणी कामगार, पोलिस यांच्यासाठी घरे बांधण्यावर भर दिला जाणार आहे.
मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णतः ऑनलाइन अशा IHLMS २.० या संगणकीय प्रणालीद्वारे ही सोडत प्रक्रिया राबविण्यात आली आहे. सदर सोडत नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ ठरल्यामुळे नागरिकांचा सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. आशिया खंडातील सर्वात मोठा समूह पुनर्विकास प्रकल्प ठाणे येथे राबविण्यात येत असून या माध्यमातून हजारो घरे उभारली जाणार आहेत. शहरांमध्ये नवीन शहर निर्माण करायचा प्रयत्न या माध्यमातून महाराष्ट्र शासन करीत आहे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए), ‘म्हाडा’चे रखडलेले गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावण्यासाठी शासनाच्या विविध संस्था यांना एकत्र आणून त्यांच्या माध्यमातून हे प्रकल्प मार्गी लावले जात आहेत. घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगर प्रकल्प हा त्याचाच एक भाग आहे. प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत मोठ्या प्रमाणात राज्यात गृह बांधणी केली जात आहे. या सोडतीत घर न लागलेल्या अर्जदारांनी निराश न होता त्यांच्यासाठी लवकरच म्हाडातर्फे सोडत जाहीर काढली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिली.
‘म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. श्री. जयस्वाल म्हणाले की, म्हाडातर्फे दरवर्षी राज्यात सुमारे ३०,००० घरांची सोडत काढण्याचे नियोजन असून दर तीन ते सहा महिन्यात म्हाडाच्या कुठल्यातरी मंडळाची सोडत काढण्याचे प्रस्तावित आहेत. गेल्या दीड वर्षातील म्हाडा कोकण मंडळांची ही तिसरी संगणकीय सोडत आहे. गेल्याच आठवड्यात पुणे मंडळाने देखील ३६६२ सदनिकांची सोडत काढली. आगामी नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये म्हाडातर्फे विकास नियंत्रण नियमावली ३३(५), ३३(७), ३३(९), ३३(२४) बदल प्रस्तावित केले असून त्या माध्यमातून अधिकाधिक परवडणारी दर्जेदार घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच भाडेतत्त्वावरील घरे उपलब्ध व्हावीत यासाठीही धोरणात बदल प्रस्तावित केले आहेत.
कोकण मंडळाच्या २१४७ सदनिका व ११७ भूखंड विक्रीकरिता सुमारे २४,९११ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले. कोकण मंडळाने ठाणे शहर व जिल्हा, रायगड, सिंधुदुर्गमधील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या सदनिका व भूखंड विक्रीच्या सोडतीसाठी अर्ज भरणा प्रक्रियेला ११ ऑक्टोबर, २०२४ रोजी प्रारंभ करण्यात आला.
सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले . अर्जदारांना ‘वेबकास्टिंग’ तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सोडतीच्या कार्यक्रमाचे घरबसल्या थेट प्रक्षेपण (Live) बघण्याची सुविधा म्हाडाच्या @mhadaofficial या अधिकृत युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवरून उपलब्ध करून देण्यात आली. युट्यूब चॅनलद्वारे सोडतीचे थेट प्रक्षेपण सुमारे ११,००० नागरिकांनी बघितले. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी ६.०० वाजता प्रसिद्ध करण्यात येणार असून विजेत्या अर्जदारांना ईमेल व एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.
या कार्यक्रमाला व्यासपीठावर ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री. सौरभ राव, ‘म्हाडा’चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल वानखडे, म्हाडाचे मुख्य अभियंता श्री. महेश जेस्वानी, मुख्य अभियंता श्री. शिवकुमार आडे, कोकण मंडळाच्या मुख्याधिकारी श्रीमती रेवती गायकर, मुंबई मंडळाच्या सहमुख्य अधिकारी श्रीमती वंदना सूर्यवंशी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी श्री. उमेश वाघ आदी उपस्थित होते.
म्हाडाचे उपअभियंता श्री. अभयकुमार कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.
जर आमच्या लेखावर काही प्रश्न वा दृष्टिकोन असेल तर आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. यासाठी आमच्या मुख्य संपादक झुमुर घोष यांना jhumur.ghosh1@housing.com या ईमेलवर लिहा. |